कागद आणि कापडी पिशव्यांना मोठी मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर प्लास्टिकला पर्याय म्हणून अनेक पर्यायी गोष्टींचा शोध सर्व स्तरांतील नागरिकांकडून घेतला जात आहे. कॅरिबॅगला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक महिलांना रोजगाराची नवीन संधी चालून आली आहे.

कागद आणि कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यात अनेक लहान बचत गट आणि महिला उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. वर्तमान पत्रांच्या कागदापासून बनवलेल्या पिशव्या, जाड खाकी कागदापासून बनवलेल्या पिशव्या, मांजरपाटाच्या कापडापासून तयार केलेल्या पिशव्या, कॅनव्हास प्रकारच्या कापडापासून बनवलेल्या पिशव्या असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

रुपाली जाधव या गृहिणी असून प्लास्टिक बंदीनंतर त्यांनी कागदी पिशव्यांच्या उद्योगात आपला जम बसवला आहे. त्या सांगतात, प्लास्टिक बंदीचा निर्णय होण्याच्या काही दिवस आधीच सहज म्हणून कागदी पिशव्या बनवण्याचे शिक्षण मी घेतले होते. प्लास्टिक बंद होणार हे समजताच मी माझ्याबरोबर आणखी काही मैत्रिणींना घेऊन जाड खाकी कागदाच्या पिशव्या बनवण्यास सुरुवात केली. २ उद्योजकांची पाच-पाचशे पिशव्यांची मागणी आम्ही पूर्ण केली. संपूर्ण प्लास्टिक बंदीला काही प्रमाणात विरोध होत असला तरी आम्हाला मात्र या बंदीमुळे काम आणि रोजगार मिळाला.

शर्वरी रेडकर या कापडी वस्तू बनवण्याच्या उद्योगात कार्यरत आहेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय झाल्यानंतर काही गरजू महिलांना मदतीला घेऊन त्यांनी कागदी आणि कापडी पिशव्यांचा उद्योग सुरु केला. अनेक कप्पे असलेली कॅनव्हासची पिशवी, भेटवस्तू देण्यासाठी कागदी पिशव्या यांना बरीच मागणी असून आणखी काही महिलांना रोजगार देण्याएवढे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra plastic ban