प्लास्टिकबंदीवर पानविक्रेत्यांचा नामी उपाय

पानखवय्यांना पान बांधून देण्यासाठी पानविक्रेत्यांनी उपाय शोधला आहे. पानविक्रेते प्लास्टिक कागद आणि पिशवीऐवजी आता तेंदुपत्ता, बटर पेपर आणि सिल्व्हर फॉइलमध्ये पाने बांधून देऊ लागले आहेत.

पानविक्रेत्यांकडे पान बांधून देण्यासाठी प्लास्टिक कागद आणि पिशवीचा वापर केला जात होता. प्लास्टिकबंदी पूर्वीही काही पानविक्रेते पत्रावळ, कागदी द्रोणचा वापर करत होते. मात्र, बहुसंख्य पानविक्रेते प्लास्टिकचाच वापर करत होते. मात्र, प्लास्टिकबंदी झाल्यामुळे या प्लास्टिकचा वापर थांबला आहे. प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दोन दिवसांत पानविक्रेत्यांची थोडी गडबड झाली. मात्र, त्यावर उपाय शोधत बटर पेपर, तेंदुपत्ता, सिल्व्हर फॉइल, साध्या कागदाचा वापर केला जात आहे. त्यामुळे पानविक्रेत्यांच्या व्यवसायावर प्लास्टिकबंदीचा तितकासा परिणाम झाला नाही. काही ग्राहक दिवसाला पाच-दहा पाने पार्सल घेतात. त्यांना पुठ्ठा बॉक्स दिला जातो, अशी माहिती पानविक्रेत्यांनी दिली.

‘प्लास्टिकबंदी आवश्यकच होती. पानाच्या दुकानात पान बांधून देण्यासाठी प्लास्टिक कागदाचा वापर केला जायचा. त्याचे प्रमाणही भरपूर होते. मात्र, तेंदुपत्ता, बटरपेपर आणि पुठ्ठा बॉक्समुळे काहीही अडचण होत नाही,’ असे जगन्नाथ पान सेंटरच्या दीपक शेट्टी यांनी सांगितले.

Story img Loader