मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्ष बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा शिव संपर्क अभियान सुरू केलं आहे. शिवसेनेकडून राज्यभर शिव संपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून पलटवार केला.
शिवसंपर्क अभिनायानाच्या निमित्ताने उर्मिला मातोंकर पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानांविषयी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
हेही वाचा-…मग स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार नाही का?; संजय राऊतांना भाजपाचा सवाल
बारा आमदारांची यादी आणि राज्यपाल…
विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय राज्यपालांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यावर मातोंडकर म्हणाल्या, “तो एक वेगळाच विषय आहे. राज्यपाल ती यादी मान्य करतील, तेव्हा करतील. त्यामुळे आपलं काम थांबत नाही. तसेच मी एखादी गोष्ट डोक्यात ठेवून राजकारणात आलेली नाही. जर राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीवर बोलायचं झाल्यास तोंडावर मास्क आहे, तोच बरा आहे”, असं म्हणत त्यांनी अधिकच भाष्य करणं टाळलं.
हल्लीचे नेते एक केळी वाटतात आणि चार फोटो काढतात…
नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या मदतीवरही उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला. “जेव्हा २०१९ मध्ये राज्यात पूर आला, तेव्हा मी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे चार दिवसाच्या दौर्यावर गेले होते. ही गोष्ट मी प्रसार माध्यमांना देखील सांगितली होती आणि त्यांनी माझं काम पाहिलं आहे. हल्लीचे नेते एक केळी वाटतात आणि चार फोटो काढतात”, अशा शब्दात त्यांनी चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना सुनावलं.
हेही वाचा- स्वातंत्र्याची जाणीव करून देणं हे देश उलथवून टाकणं झालं का?; संजय राऊत मोदी सरकारवर भडकले
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “सामनाचे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी, हे फादर स्टॅन सामी जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते; त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात,” अशी टीका केली होती.