पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रिलायन्स जिओ कंपनीच्या कार्यालयामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, कंपनीने नियमांची पूर्तता करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये रिलायन्स जिओचे कार्यालय आहे. या कार्यालयात शीतकरण यंत्रणा म्हणजेच चिलर बसविण्यात आले आहेत. या चिलरचा आवाज मोठा असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना याचा त्रास होत होता. त्यामुळे कार्यालयाच्या शेजारील ब्ल्यू रिज सोसायटीतील नंदिनी चक्रवर्ती यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे २०२३ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओच्या कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली होती. तेथील आवाजाची पातळी ७४ डेसिबल असल्याचे तपासणीत समोर आले.
हेही वाचा >>>“…तर सीमेवरील सुरक्षेत वाढ करावी”, सैफ अली खानच्या घटनेनंतर रोहित पवारांचं वक्तव्य
या प्रकरणी २६ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात सुनावणी झाली. ही सुनावणी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या सुनावणीला रिलायन्स जिओचे अधिकारीही उपस्थित होते. या सुनावणीनंतर मंडळाने जिओला नोटीस बजावली आहे. कार्यालयामुळे निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबतचा कृती आराखडा सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश मंडळाने कंपनीला दिले आहेत. याचबरोबर आवाज कमी करणारी यंत्रणा बसविण्यासाठी ३ महिन्यांची मुदतही कंपनीला देण्यात आली आहे. याबाबत रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने नियमांची पूर्तता दिलेल्या मुदतीत केली जाईल, असे स्पष्ट केले.
रिलायन्स जिओने ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याचा अहवाल मंडळाकडे १५ दिवसांत सादर करावा. त्यांनी मंडळाच्या निर्देशांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले जाईल. – जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
आवाजाची मर्यादा पातळी किती?
विभाग – दिवसा – रात्री (डेसिबलमध्ये)
औद्योगिक – ७५ – ७०
व्यावसायिक – ६५- ५५
निवासी – ५५ – ४५
शांतता क्षेत्र – ५० – ५०