पुणे : बेकायदा दस्त नोंदणी, सर्व्हरमध्ये येणारे तांत्रिक अडथळे आदी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करूनही नोंदणी महानिरीक्षक, महसूल मंत्री हे नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. या कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी नवीन शासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.
आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नोंदणी व मुद्रांक विभागातील उपसचिव, सचिव कक्ष अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरिक्षक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांचे कामकाज सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत नागरिकांसाठी खुले करावे. राज्यातील विविध ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या बेकायदा दस्त नोंदणीची विशेष चौकशी समितीद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आदी मागण्या सुरवसे यांनी केल्या.
हेही वाचा : पिंपरी चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ प्रकल्पावरील स्थगिती उठल्याने काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा
‘पुणे शहरात बनावट अकृषिक दाखले (एनए), बनावट भोगवटा प्रमाणपत्रांच्या आधारे नोंदविण्यात आलेल्या दस्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या दुय्यम निबंधक, सेवानिवृत्त सह जिल्हा निबंधक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत’, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी या वेळी केली.
हेही वाचा : लोकअदालतीत एक लाखांहून अधिक दावे निकाली… ३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल
‘राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे युवक काँग्रेसकडून नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात सातत्याने निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र महसूल मंत्र्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. महसूल खाते व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर विखे पाटील यांनी त्वरीत राजीनामा द्यावा’, असे माजी आमदार जोशी यांनी या वेळी सांगितले.