महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवे स्वरूप जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आयोगाने बदलले असून, आता भाषेची परीक्षा बहुपर्यायी आणि दीघरेत्तरी अशी मिश्र स्वरूपाची असणार आहे. भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.
आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भाषा विषयांच्या परीक्षेलाही बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्याचे आयोगाने जाहीर केले होते. याबाबत जून २०१५मध्ये आयोगाने परिपत्रकही काढले होते. उत्तरपत्रिकांची तपासणी लवकरात लवकर होऊन वेळेवर निकाल जाहीर करणे शक्य व्हावे, त्याचप्रमाणे बहुपर्यायी स्वरूपामुळे मूल्यमापनातही अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असावे याबाबत आयोगाने विद्यार्थी, शिक्षकांनाच विचारार्थ पर्याय देऊन सूचना मागवल्या होत्या. आलेल्या सूचनांचा विचार करून आयोगाने प्रश्नपत्रिकेचे अंतिम स्वरूप जाहीर केले आहे.
नव्या स्वरूपानुसार भाषा विषयांची परीक्षा दोन भागांत घेण्यात येणार आहे. पहिल्या भागांत मराठी आणि इंग्रजीचे प्रत्येकी ५० गुणांचे दीघरेत्तरी प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन, भाषांतर यांचा समावेश आहे. दुसऱ्या भागांत दोन्ही भाषांचे प्रत्येकी ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. शंभर गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत १ ते ५० क्रमांकाचे प्रश्न हे मराठी भाषेचे, तर ५१ ते १०० क्रमांकाचे प्रश्न हे इंग्रजी भाषेचे असणार आहेत. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचा उगम, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे, शब्दार्थ यांवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बहुपर्यायी प्रश्नांसाठी उणे मूल्यांकनही (निगेटिव्ह मार्किंग) राहणार असून, तीन चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण कमी होणार आहे. भाषेचे एकूण २०० गुण अंतिम गुणांमध्येही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये नव्या स्वरूपातील प्रश्नपत्रिका असणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर बदललेले स्वरूप जाहीर करण्यात आले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेत भाषेची बहुपर्यायी, दीघरेत्तरी प्रश्नपत्रिका
भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-05-2016 at 02:47 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra public service commission announced the new format