पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या या परीक्षा आता पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत करण्यात येत आहे.
एमपीएससीने या निर्णयाबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे गुरुवारी दिली. एमपीएससीने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव त्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. आता या दोन्ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतल्या जातील. या दोन्ही परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. तसेच पदसंख्या, आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>बाणेर, बालेवाडी, औंध भागात बंदला संमिश्र प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण
आतापर्यंत घेण्यात आलेल्या सरळसेवा भरतीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर उमेदवारांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीने प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीनेच परीक्षा घेण्याची उमेदवारांची मागणी होती. त्यानुसार आता एमपीएससीने निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. भविष्यात एमपीएससीने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार केल्यास आता स्वत:ची परीक्षा केंद्रे, यंत्रणा उभी करून परीक्षा घ्यावी, असे स्टुडंट्स राइट असोसिएशनचे महेश बडे यांनी सांगितले.