पुणे : राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. १ जून ते ४ सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यात नगर, सांगलीत सरासरीपेक्षा जास्त, तर हिंगोलीत सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे.राज्यात एक जून ते चार सप्टेंबर या काळात सरासरी ८४५.१ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक, म्हणजे १ हजार ९३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. कोकणात ३ हजार २७६ मिलिमीटर (सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ९०३.७ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ४८ टक्के अधिक), मराठवाड्यात ६७३.९ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ३३ टक्के अधिक), तर विदर्भात ९५४.५ मिलिमीटर (सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवात कडक बंदोबस्त; उत्सवी गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला आहे. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के (५८१ मिमी), तर सांगलीत सरासरीच्या ७२ टक्के (६२८ मिमी) अधिक पाऊस झाला आहे. तसेच सरासरीच्या ५० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद जळगाव (५१ टक्के), पुणे (५५ टक्के), बीड (५१ टक्के) आणि लातूर (५९ टक्के) जिल्ह्यांत झाली आहे.
कोकणात सरासरीच्या २७ टक्के आणि विदर्भात सरासरीच्या १७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. कोकण, विदर्भाच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे.
हेही वाचा >>> मोठी बातमी! दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली, तरी हिंगोलीत सरासरीच्या ३१ टक्के कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीतील पावसाची सरासरी ६४७.५ मिमी आहे. तेथे यंदा ४४७ मिमी पाऊस पडला. अमरावतीत २ टक्के कमी पाऊस झाला आहे. अमरावतीची सरासरी ७०९.३ मिमी असून, यंदा ६९५.७ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. गोंदियात ८ टक्के कमी पाऊस पडला आहे. गोंदिया जिल्ह्याची सरासरी १ हजार ६३ मिमी आहे. मात्र, यंदा ९८०.७ मिमी पाऊस पडला आहे. हे तीन जिल्हेवगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोलीत कमी पाऊस का ?
गेल्या चार- पाच दिवसांत हिंगोलीत चांगला पाऊस झाला आहे. मात्र, जून ते ऑगस्टअखेर पावसाने ओढ दिली होती. हिंगोलीची भौगोलिक रचना आणि स्थान असे आहे, की विदर्भातून आणि तेलंगणावरून येणारा पाऊस हिंगोलीत पोहोचेपर्यंत पावसाचा जोर कमी होतो. गेल्या वर्षीही हिंगोलीत पावसाने ओढ दिली होती. पाऊस हिंगोलीत सप्टेंबरअखेर सरासरी गाठेल, असे मत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.