पुणे : करोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील एक रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील तर दुसरा सांगलीतील आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नवीन ८७ करोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २६५ आहे. सर्वाधिक १०३ सक्रिय रुग्ण मुंबईत असून, त्याखालोखाल पुण्यात ५३ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४३ आहे. राज्यात पुणे महापालिका हद्दीत एक आणि सांगलीत एक अशा दोन करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात जानेवारीपासून वर्षभरात १३६ करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ससूनमध्ये आणखी एक घोटाळा : मेडिकल बिले मंजुरीसाठी लाच घेताना कर्मचारी जाळ्यात

राज्यात आतापर्यंत करोनाविषाणूनचा नवीन उपप्रकार जेएन.१चे एकूण १० रुग्ण आढळले आहेत. त्यात ठाणे महापालिका ५, पुणे महापालिका २, पुणे जिल्हा १, अकोला महापालिका १ आणि सिंधुदुर्ग १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात जेएन.१चा आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

– सांगली येथील १ करोना मृत्यू २१ डिसेंबरला खासगी दवाखान्यात झाला असून त्या व्यक्तीचे वय ७५ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला मधुमेह, रक्तदाब आणि संधिवात हे आजार होते. या व्यक्तीने करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या.

– पुणे येथील १ करोना मृत्यू २४ डिसेंबरला खासगी दवाखान्यात झाला असून त्या व्यक्तीचे वय ८१ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला मूत्रपिंड विकार होता . या व्यक्तीने करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 2 covid deaths 1 reported from pune other from sangli 87 new covid cases pune print news stj 05 zws