पुणे : नवीन नाट्यनिर्मितीसाठी नाट्यनिर्मिती संस्थांना देण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून नियुक्त या समितीमध्ये २३ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार असून आता नाट्यनिर्मिती संस्थांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन नाट्यनिर्मितीसाठी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र, संबंधित नाटक अनुदानासाठी पात्र आहे की नाही, त्याचा दर्जा, निर्मिती नियमात आहे की नाही, याचे परीक्षण नाट्य परीक्षण समिती करते. या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपवीत, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रा. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरूप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गीते यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी २३ सदस्यांपैकी किमान ११ सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक राहील.