पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली आहे. प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवडयादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल.
वंचित घटक, सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा : भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक
या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ लाख ५ हजार २२३ रिक्त जागांसाठी एकूण २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले. त्यातील ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तर ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश आहे.