पुणे : आगामी काळात राज्यात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवले जाणार आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यासाठी परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवला आहे. मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यास राज्यातील नवीन रिक्षांना परवाना देणे बंद होणार आहे.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर
राज्यातील रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक रिक्षा संघटनांकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. यानुसार परिवहन विभागाने पावले उचलत याबाबतचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील नवीन रिक्षांच्या परवान्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> वंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’
रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे परवाना मिळत असल्याचे कारण आहे. मागील वर्षी आणि चालू वर्षातही पुण्यात रिक्षांची नोंदणी वाढली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर रिक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रिक्षा वाढल्याने त्यांना पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, असा दावा रिक्षा संघटना करीत आहेत. त्यामुळेच खुल्या रिक्षा परवान्यावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
पुण्यातील रस्त्यांवर लाखभर रिक्षा
राज्यात सर्वाधिक रिक्षा पुण्यात आहेत. राज्यभरात ८ लाख रिक्षा आहेत. त्यातील तब्बल एक लाख रिक्षा पुण्यात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ हजार ५०० रिक्षा आहेत.