पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यभरात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वांत कमी १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे आकाश निरभ्र आहे. परिणामी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. रविवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये ३६.२ तर वर्ध्यात कमाल तापमान ३५.० अशांवर होते.
हेही वाचा : बारावी, दहावीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय? सहज आणि मोफत मदत मिळणार!
मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा चढाच राहिला. नांदेडमध्ये ३५.८, परभणीत ३६.५, तर उत्तर महाराष्ट्रात जळगावात, मालेगावात ३६.२. मध्य महाराष्ट्रातील सांगलीत ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत किनारपट्टीलगत कमाल तापमान कमी राहिले, सरासरी तापमान ३२.० अंश सेल्सिअस होते. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाल तापमानात सरासरी १.० अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून थंडी कायमची कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात एका पाठोपाठ तीव्र पश्चिमी झंजावात सक्रिय होत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात काहीशी थंडी आहे. मात्र, या पश्चिमी झंझावाताचा (थंड वाऱ्याचा) राज्यातील वातावरणावर कोणताही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी दिली.