पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेला लोकाभिमुख करणाऱ्या प्रा. मिलिंद जोशी यांची लेखन आणि वक्तृत्वशैली अनोखी आहे. संस्थात्मक पातळीवर काम करीत असताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बंद करून निवडीतील राजकारण आणि टोळीयुद्ध बंद पाडण्यासाठी योग्य हस्तक्षेप करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. अन्यथा डाॅ. जयंत नारळीकर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष होऊ शकले नसते, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
आडकर फाउंडेशनतर्फे डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांना ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी मोरे बोलत होते. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड आणि फाउंडेशनचे प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
डॉ. मोरे म्हणाले, ‘निवडणुकीमुळे पात्रता नसलेले अनेक लेखक अध्यक्ष झाले. या रणधुमाळीत चांगले लेखक उतरले नाहीत. त्यामुळे ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत. प्रा. जोशी यांनी घटना बदलासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे चांगले अध्यक्ष मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात योग्य ती शिस्त व संघटितपणे कार्य करून संस्थेचा डोलारा जोशी सक्षमपणे सांभाळत आहेत. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा विस्तारत जातील.’
डॉ. दीक्षित म्हणाले, ‘प्रा. जोशी उत्तम योजक, अभियंता, अभ्यासक, लेखक आणि वक्ता आहेत. वैचारिक, ललित आणि समीक्षण प्रकारातील त्यांचे लिखाण उत्तम दर्जाचे असून, त्यांचे संस्थापटुत्वही स्पृहणीय आहे.’
हेही वाचा : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती
जोशी म्हणाले, ‘लेखन आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी परस्परपूरक ठरल्या. संस्थात्मक कामामुळे मला समाजजीवन जवळून पाहता आले. थोर व्यक्तींच्या सहवासामुळे मी समृद्ध होत गेलो.’