पुणे : ‘समाजात अत्यंत वैयक्तिक पातळीवर डावे-उजवे असा संघर्ष सुरू झाला आहे. अगदी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठालाही राजकीय कडवेपणा आलेला दिसतो. मराठी भाषेच्या भविष्याविषयी सातत्याने निराशेचा सूर व्यक्त केला जातो. समाजात एकप्रकारची उदासीनता आलेली दिसते. साहित्याची निर्मिती मुबलक प्रमाणात होते आहे. त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसते. मात्र, ते वाचले जाते का?, असा प्रश्न पडतो. साहित्यावर चर्चा होऊन ते आत्मसात करण्याची प्रक्रिया आज थांबलेली दिसते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विनया खडपेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. खडपेकर म्हणाल्या, ‘मराठी माणसाच्या मनातील त्यागाची कल्पना सुटली पाहिजे. अर्थार्जन म्हणजे नफेखोरी नाही. प्रामाणिकपणे काम करत, सामाजिक बांधिलकी जपत मोबदला घेणे चुकीचे नाही. भरपूर पैसा मिळवणे आणि उपभोग करणे यात काहीही गैर नाही. मराठी भाषा आणि उद्योजकता यांचे सूर जुळले पाहिजेत. मराठी भाषेच्या वापरातून अर्थार्जनही झाले पाहिजे.’
‘साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नाही. ती जीवनाची साधना आहे. समूहात सामील झाल्याशिवाय आपले अस्तित्व टिकणार नाही, अशी भीती साहित्यिकांत निर्माण झाली आहे. त्यामुळे विचार वादांचे झेंडे घेऊन फिरावे लागते. निर्हेतुक साहित्य अधिक सच्चे असते,’ अशी भावना प्रा. जोशी यांनी व्यक्त केली.
विशेष साहित्य पुरस्काराचे मानकरी
द. वा. पोतदार स्मृती पुरस्कार – विजय आपटे
चिं. वि. जोशी स्मृती पुरस्कार – सारिका कुलकर्णी (ग्रंथाली प्रकाशन)
रा. श्री. जोग स्मृती पुरस्कार – डॉ. मीनाक्षी पाटील (पॉप्युलर प्रकाशन)
शं. ना. जोशी स्मृती पुरस्कार – अर्चना जगदीश
कवी यशवंत स्मृती पुरस्कार – राजेंद्र शहा
विद्याधर पुंडलिक स्मृती पुरस्कार – मृणालिनी चितळे
सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार – संकेत म्हात्रे
निर्मला मोने स्मृती पुरस्कार – डॉ. मेधा कुमठेकर
कुंदा देशपांडे स्मृती पुरस्कार – डॉ. प्रतिमा इंगोले