महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प वैयक्तिक रीत्या ग्रंथ दत्तक घेणाऱ्या ‘दात्यां’च्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पाबाबत गेल्या चार महिन्यांत दूरध्वनीद्वारे चौकशी करण्यापलीकडे फारसे काही घडलेले नाही.
शतकोत्तर दशकपूर्ती केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात ललित साहित्य, समीक्षा धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवरील ४५ हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यापैकी काही पुस्तकांनी वयाची शंभरी पार केलेली आहे. तर, काही पुस्तके दुर्मीळ स्वरूपाची आहेत. जीर्ण झाल्यामुळे पान उलटता येत नाही आणि नीटपणे हाताळता येत नाहीत अशा पुस्तकांची संख्या ही सात हजारांच्या घरात आहे. त्यातील किमान दोन हजार पुस्तके डिजिटायझेशनच्या माध्यमातून जतन करणे आवश्यक झाले आहे. त्यापैकी प्राधान्याने डिजिटल माध्यमाद्वारे जतन केलीच पाहिजेत अशा सहाशे पुस्तकांची सूची करण्यात आली आहे.
परिषदेच्या कार्यकारिणीने वर्षपूर्तीनंतरच्या भावी उपक्रमांमध्ये दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याची घोषणा केली होती. यामध्ये प्रत्येक ग्रंथाच्या डिजिटायझेशनचा खर्च हा साहित्यप्रेमी पुणेकरांनी वैयक्तिक रीत्या उचलून यामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले होते. लोकसहभागातून हा प्रकल्प पूर्णत्वास जावा असा परिषदेचा मानस होता. मात्र, त्यानंतर चार महिन्यांमध्ये या संदर्भात चौकशी करणारे दूरध्वनी करणाऱ्या नागरिकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे, अशी माहिती प्रा. मििलद जोशी यांनी दिली. केवळ पुणेकरांनाच नाही, तर परिषदेच्या शाखांनीही अशा पद्धतीचे आवाहन करून ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी वैयक्तिक दाता मिळविण्यावर भर द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. यामध्ये लोकसहभाग वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, डिजिटायझेशन हा प्राधान्याने करावयाचा प्रकल्प असून त्यासाठी प्रायोजकांचेही अर्थसाह्य़ घेण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.
शंभर ग्रंथांचे जतनीकरण
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेतील शंभर दुर्मीळ पुस्तकांचे जतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये शंभर वर्षांपूर्वीच्या या ग्रंथांच्या पानांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. संस्थेचे तत्कालीन प्रभारी संचालक अशोक सोलनकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाल्याने हे काम थांबले, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी दिली.