महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक पुरस्कार संख्येमध्ये वाढ झाली आहे. राजहंस प्रकाशनतर्फे रेखा ढोले यांच्या नावाने ग्रंथनिर्मिती आणि अनुवाद या क्षेत्रांमध्ये तीन पुरस्कारांची भर यंदापासून पडणार आहे.
राजहंस प्रकाशनच्या सुहृद आणि साहित्यप्रेमी रेखा ढोले यांचे २१ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांची साहित्याबद्दलची आस्था आणि प्रकाशनच्या विविध पुस्तकांच्या दर्जेदार निर्मितीमधील त्यांचे मौलिक सहभाग ध्यानात घेऊन राजहंस प्रकाशन आणि ढोले कुटुंबीयांनी दोन स्मृती पुरस्कार देण्याची योजना आखली आहे. हे दोन्ही पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिले जातील, अशी माहिती राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी गुरुवारी दिली. किमान पाच वर्षे हे पुरस्कार देण्याची योजना आहे. त्यानंतर या पुरस्कारांसंदर्भातील आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कार्यवाह डॉ. कल्याणी दिवेकर या वेळी उपस्थित होत्या.
ग्रंथनिर्मिती क्षेत्रात मुखपृष्ठ आणि अंतर्गत रचनाकारास १५ हजार रुपयांचा आणि प्रकाशन संस्थेस १० हजार रुपयांचा, तर अन्य भाषांतून मराठी भाषेत साहित्यानुवाद करणाऱ्या अनुवादकास २५ हजार रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी प्रकाशन संस्थांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या मुदतीत प्रसिद्ध झालेली पुस्तके महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे पाठविणे अपेक्षित आहे. अनुवाद पुरस्कारासाठी अनुवादकाने किंवा प्रकाशकाने पुस्तक सादर करणे अपेक्षित नाही, असेही बोरसे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या साहित्य पुरस्कारामध्ये लेखक-कवी, समीक्षक, बालसाहित्यकार आणि प्रकाशक यांना पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र, यामध्ये चित्रकार, व्यंगचित्रकार आणि मुखपृष्ठकार यांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही, याकडे रविमुकुल यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा रविमुकुल यांनी व्यक्त केली. साहित्य महामंडळ याविषयी योग्य तो पाठपुरावा करेल, असे प्रकाश पायगुडे यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सु. रा. चुनेकर, डॉ. श्रीराम गीत, चित्रकार रविमुकुल, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रा. रुपाली िशदे यांचा समावेश असलेली पुरस्कार निवड समिती हे पुरस्कार निश्चित करणार असून परिषदेच्या कार्यवाह डॉ. कल्याणी दिवेकर या निमंत्रक म्हणून काम पाहणार असल्याचे पायगुडे यांनी सांगितले.
…
पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात
लेखकांच्या वारसांना ‘मसाप’चे आवाहन
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ लेखकाच्या नावाने पुरस्कार दिले जातात. त्यासाठी त्यांच्या वारसांनी परिषदेकडे काही रक्कम देणगी दिली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. मात्र, वाढती महागाई आणि रुपयाचे झालेले अवमूल्यन या कारणांमुळे या पुरस्काराची रक्कम तुटपुंजी झाली आहे. या पुरस्काराच्या रकमेत घसघशीत वाढ व्हावी यासाठी ठेवीच्या रकमेमध्ये वाढ करावी यासंदर्भात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखकांच्या वारसदारांना विनंती केली आहे. तीन पुरस्कारांच्या रकमेमध्ये वाढ करावी यासाठी तीन वारसदारांशी पत्रव्यवहार केला आहे. ते शक्य न झाल्यास, परिषदेतर्फे या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र, त्यासाठी या वारसदारांची परवानगी घ्यावी लागेल, असे प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.
….
पुरस्काराची रक्कम किती यापेक्षाही तो देणारी संस्था आणि पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो याला अधिक महत्त्व असते. परिषदेतर्फे १९९२ मध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांना दत्तो वामन पोतदार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यास येऊ न शकलेल्या पगडी यांनी परिषदेला पत्र पाठविले होते. ‘मी अंथरुणाला खिळून आहे, अन्यथा पोतदारांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आनंदाने पळत आलो असतो’, अशी भावना पगडी यांनी व्यक्त केली होती, अशी आठवण डॉ. कल्याणी दिवेकर यांनी सांगितली. त्या वेळी शंभर रुपये असलेला हा पुरस्कार आता एक हजार रुपयांचा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या’च्या वार्षिक पुरस्कार संख्येत वाढ
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक पुरस्कार संख्येमध्ये वाढ झाली आहे. राजहंस प्रकाशनतर्फे रेखा ढोले यांच्या नावाने ग्रंथनिर्मिती आणि अनुवाद या क्षेत्रांमध्ये तीन पुरस्कारांची भर यंदापासून पडणार आहे.
आणखी वाचा
First published on: 22-03-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sahitya parishad rajhans publication award