मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या आद्य संस्थेने आपल्या आजारी शाखांचे लवकरात लवकर पुनरुज्जीवन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत बहुतांश शाखा सक्रिय होणार आहेत.
सातारा येथे सुरू असलेल्या विभागीय साहित्य संमेलनापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक झाली. त्यामध्ये परिषदेच्या शाखांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आजारी शाखांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.
मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे ‘मसाप’चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्य़ाच्या ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असल्याची माहिती समोर आली. काही शाखांमध्ये अनेक वर्षांत निवडणुकाच झालेल्या नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झालेले नाहीत. तर, काही शाखांतील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. अशा आजारी शाखांना भेट देत परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधींनी शाखांच्या कामकाजाचा ताळेबंद, सभासद संख्या, बँक व्यवहार याची माहिती घेऊन त्यासंदर्भातील आपला अहवाल परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाखा सुदृढ झाल्या तर साहित्य परिषदेच्या कार्याची व्याप्ती वाढेल याच भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी अखेपर्यंत सर्व शाखांचे अहवाल हाती आल्यानंतर प्रत्येक शाखेला भेट देण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
‘मसाप’च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर शाखांनी उत्कृष्ट काम करावे हीच परिषदेची अपेक्षा आहे. भविष्यामध्ये शाखांसाठी स्पर्धा घेऊन चांगले काम करणाऱ्या शाखांना पुरस्कार देण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sahitya parishad will reconstruct our branches
Show comments