पुणे : राज्यात मोसमी पाऊस सुरू झाल्यापासून ‘ऑरेंज अलर्ट,’ ‘यलो अलर्ट’ अनेकदा हवामान विभागाकडून देण्यात आला. मात्र आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
हेही वाचा >>> प्रवाशांसाठी खूषखबर! कागदी पिशव्यांना रेल्वेचा मोफत पर्याय; घरीही नेता येणार
यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरीइतकाच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्यासाठी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटकही अनुकूल असणे आवश्यक आहे. अद्याप तशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. देशभरात पाऊस पडत असला तरी त्याची तीव्रता दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे.
हेही वाचा >>> पुणे: भारती विद्यापीठ भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी ७ जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती दिली. त्यानुसार आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. देशपातळीवर सरासरीपेक्षा तीन टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे ७ जुलैपर्यंत राज्यात २७७.७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा २०३.८ मिलीमीटर पाऊस पडला. कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा ३ टक्के, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३१ टक्के, मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने त्याचा शेतीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील उर्वरित काळात तरी पावसाची सरासरी भरून निघणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.