पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात १.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस

राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी आहे. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यावेळीही जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले आणि ९७ टक्के मुलींनी शालांत परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. २३ हजार २८८ शाळांपैकी ९ हजार ३८२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते.

विभागनिहाय निकाल

●पुणे : ९६.४४ ●छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ ●मुंबई : ९५.८३ ●कोल्हापूर : ९७.४५ ●अमरावती : ९५.५८ ●नाशिक : ९५.२८ ●लातूर : ९५.२७ ●कोकण : ९९.१ ●नागपूर : ९४.७३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc 10th result declared 187 student in maharashtra get 100 percent marks zws