पुणे : राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांत गैरमार्ग प्रकरण आढळलेल्या ८१८ परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक अशा परीक्षा संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील असून, तसेच संवेदनशील परीक्षांच्या केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. राज्यात बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषगाने मुख्य सचिवांनीही बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यात जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षा संबंधित घटकांची फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे तपासणी, विभागीय मंडळातर्फे अधिकृत ओळखपत्र देणे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यावर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात फोटोकॉपी केंद्र बंद ठेवणे, कलम १४४ लागू करणे, परीक्षा केंद्राबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे चित्रीकरण करणे, परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात गेल्या पाच वर्षांत गैरमार्ग प्रकरण आढळलेल्या ८१८ परीक्षा केंद्रांवरील परीक्षा संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रांअंतर्गत समाविष्ट कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परीक्षेशी संबंधित कामकाज करता येणार नाही. या परीक्षा केंद्रांमध्ये पर्यवेक्षकांनी कॉपी पकडलेली केंद्रेही समाविष्ट असल्याने काही केंद्रे कमी होऊ शकतात. ८१८ परीक्षा केंद्रांमध्ये पुणे विभागीय मंडळातील १२५, नागपूर विभागीय मंडळातील १०४, छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील २०५, मुंबई विभागीय मंडळातील ५७, कोल्हापूर विभागीय मंडळातील ३९, अमरावती विभागीय मंडळातील १२४, नाशिक विभागीय मंडळातील ८८, लातूर विभागीय मंडळातील ७३ आणि कोकण विभागीय मंडळातील तीन परीक्षा केंद्रांचा समावेश असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
२७१ भरारी पथके, आकस्मिक भेटी
राज्य मंडळाकडून २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची मुभा आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
दोन विद्यार्थ्यांना विशेष सुविधा
शारीरिक अडचण असलेल्या दोन विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने परीक्षेसाठी विशेष सुविधा दिली आहे. त्यात दृष्टिदोष असलेल्या एका विद्यार्थ्याना हेडटॉर्च देण्यात येणार असून, संवेदनशील त्वचा असलेल्या एका विद्यार्थ्याला वातानुकूलन व्यवस्था असलेल्या ठिकाणी परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे गोसावी यांनी सांगितले.