पुणे : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीनंतर संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे द्यावीत, अशी अपेक्षा यावेळी संभाजीराजे यांनी व्यक्त केली. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन आयोगाला दिले. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
हेही वाचा : पॅनकार्ड अद्ययावत करण्याचा फोन आला तर सावधान!… पुण्यात निवृत्त सनदी लेखापालाची अशी झाली फसवणूक
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानांवर संभाजीराजेंनी भाष्य केले. ‘कालच्या भाषणात छगन भुजबळ यांनी सर्व मर्यादा सोडल्या. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या व्यक्तिमत्वाने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं. मी अडीच वर्षांआधी छगन भुजबळ यांच्या घरी जाऊन त्यांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं वारसदार म्हटलं होतं. आज त्याचा मला पश्चात्ताप झाला’, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ‘मनोज जरांगे हे नेहमी शांतपणाने आंदोलन करायचं, ओबीसी आणि मराठा एकत्रच आहेत असं बोलताना दिसले आहेत’, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.