पुणे : बँकांनी मध्यस्थ कंपन्यांना दूर सारून थेट बँक मित्रांशी करार करावेत आणि त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनने रविवारी केली. तसेच, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरातून मागणी दिन पाळण्याची घोषणा संघटनेने केली आहे.
महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा रविवारी पुण्यात झाली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यांतील १०२ प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत बँक मित्रांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बँक मित्रांना अल्पशा कमिशनवर काम करावे लागते. त्यांच्या सेवेत सुरक्षितता नाही. वैद्यकीयसह इतर रजा आणि कोणत्याही सेवा, सवलती त्यांना मिळत नाहीत. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची अवास्तव उद्दिष्टे बँकांकडून बँक मित्रांवर लादली जातात. उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास बँक मित्रांचे काम बंद करण्याची धमकी दिली जाते. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.
राज्यभरात सार्वजनिक क्षेत्रात २० हजारांहून अधिक बँक मित्र कार्यरत आहेत. त्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी दिवसेंदिवस घटत आहे. बँकांकडून बँक मित्रांशी थेट करार करून कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक होत होती आता बँकांकडून मध्यस्थ संस्थेमार्फत बँक मित्रांशी करार केले जातात. बँकांनी अशा मध्यस्थ कंपनीला दूर सारून थेट बँक मित्रांशी करार करावेत आणि त्यांच्या कमिशनच्या दरात वाढ करावी, ही मागणी या सभेत करण्यात आली. बँक मित्रांच्या मागण्या बँकांसह सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून बँक मित्र राज्यभरात मागणी दिन पाळणार आहेत. तसेच, संघटनेतर्फे सर्व लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या सभेस संघटनेचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर, ‘एआयबीइए’च्या सहसचिव ललिता जोशी, स्टेट फेडरेशनचे पदाधिकारी सुमित नंबियार, शिरीष राणे, शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते.
बँकिंग सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात बँक मित्र महत्वाची भूमिका बजावतात. सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या धोरणाची अंमलबजावणी त्यांच्यामुळे होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने त्यांना स्थैर्य आणि सुरक्षितता मिळवून द्यायला हवी. तरच जनधनसह इतर सरकारी योजना यशस्वी होतील.-देविदास तुळजापूरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशन