पुणे : नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज समाजमाध्यमातून पसरला आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देत पुढील वर्षीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले. देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा आहे.
नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार दहावी-बारावीच्या परीक्षा होणार नसल्याची चर्चा समाजमाध्यमांत केली जाते. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही या बाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल जाहीर करताना राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत स्पष्टीकरण दिले. गोसावी म्हणाले, की नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत सांगितले आहे. त्याशिवाय पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षीही प्रचलित पद्धतीनेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.