पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट २७ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा…कल्याणीनगरमधील ‘बॉलर’ पबच्या मालकाविरुद्ध गुन्हा; कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत
खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत
राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांना वीस रुपये प्रति दिन या दराने अतिविलंब शुल्क भरावे लागणार असून, ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षणाच्या बाहेर राहिलेल्या, पण किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना खासगीरित्या दहावी-बारावीची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.