पुणे : ‘घरांमधून, वास्तूंमधून माणसांच्या संस्कृतीचा इतिहास कळतो. त्या-त्या काळचा इतिहास हा त्या काळच्या वास्तूंमध्ये प्रतिबिंबित होत असतो. त्यामुळे माणसाच्या परंपरा वास्तूमध्येही उतरतात. माणसाच्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती समजण्यासाठी वास्तू न्याहाळण्याचे कसब आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध वास्तुरचनाकार नरेंद्र डेंगळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोरे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक-अभ्यासक डॉ. रमेश वरखेडे, प्रमोद काळे, नितीन हडप, ग्रंथाचे संपादक नरेंद्र डेंगळे, सहसंपादक मीनल सगरे, चेतन सहस्रबुद्धे आणि पुष्कर सोहोनी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात पुस्तकाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्य़ात आले होते.
मोरे म्हणाले, ‘निवारा ही माणसांची आदीम प्रेरणा आहे. निवाऱ्यासाठी वास्तू बांधली जाते, घडवली जाते. वास्तू घडताना माणसाच्या मूलभूत धारणा, संकल्पना, प्रतीके, मिथके इत्यादी प्रेरणा त्या वास्तुरचनेवर परिणाम करतात. त्यामुळे वास्तू ही त्या समाजाचा ऐतिहासिक वारसाही असते.’
‘वास्तूमध्ये माणसाच्या वैचारिक प्रवाहांबरोबरच त्याच्या गरजाही दिसत असतात. वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी सिद्ध होत असते. मूलभूत धारणांना ओलांडून वास्तूकडे पाहावे लागते. माणसाचे विचार, भौगोलिक स्थानिकता, तत्त्वज्ञान-विचार प्रवाहांना वास्तूू सामावून घेत असते. या पुस्तकात वास्तुरचनेचा, वास्तुकलेचा सर्वांगाने आढावा घेण्यात आला आहे. वास्तूकडे पाहण्याची सर्वसमावेशक दृष्टी यातून नक्कीच मिळेल,’ असे मत वरखेडे यांनी व्यक्त केले.
डेंगळे म्हणाले, ‘शाश्वत विकासाची कल्पना ही पूर्वीपासूनच आपल्या परंपरेत आहे. वास्तुकलेतही ही संकल्पना सहज आढळते. अनेक जून्या वास्तू आजही टिकून आहेत. तोडून टाकणे, उद्ध्वस्त करणे सहज सोपे असते. मात्र, निर्मितीसाठी कष्टाची आवश्यकता असते. त्यामुळे पुनर्विकासामध्ये शाश्वततेचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.’