पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. पाचवी आणि आठवीचा एकूण निकाल २०.७६ टक्के लागला. यंदा पाचवी व आठवीचे मिळून एकूण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी अंतिम निकालाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. परिषदेतर्फे १८ फेब्रुवारी रोजी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गुणपडताळणीच्या अर्जांसाठी १० मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दाखल झालेल्या अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. तसेच शासन मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली.
हेही वाचा : भिगवणजवळ मोटार उलटून तेलंगणातील पाच तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळाद्वारे अंतिम निकाल पाहता येणार आहे. छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळांना यथावकाश पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यंदा पाचवीच्या परीक्षेचा निकाल २४.९१ टक्के, तर आठवीचा १५.२३ टक्के लागला. राज्यभरातून ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांनी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ४ लाख ९२ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र झाले. तर १६ हजार ६९१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६८ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र झाले. त्यातील १४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले.