पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात येणार आहे. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगीनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेण्यात आली.

पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अंतरिम निकाल http://www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव यात दुरुस्तीसाठी ४ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अर्ज ऑनलाइनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाही, तसेच मुदतीनंतरच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरुस्ती करायची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून puppsshelpdesk@gmail.com या इमेलद्ववारे ४ मेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ३० दिवसांत कळवण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे ओक यांनी सांगितले.