पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जून अखेरीला घेण्यात येणारी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काही शिक्षक व संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे परीक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात केंद्र प्रमुखांची ४ हजार ८६० पदे मंजूर आहेत. त्यातील बहुतांश पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्तच आहेत. मात्र केंद्र प्रमुखांची भरती करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने राज्य शासनाने ५० टक्के पदे पदोन्नतीने, ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यास मान्यता दिली. प्रत्यक्षात २ हजार ४३० जागा उपलब्ध होण्याची आवश्‍यकता असताना २ हजार ३८४ इतक्‍याच जागा भरतीसाठी उपलब्ध झाल्या. आयबीपीएस या कंपनीमार्फत जून अखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने केले होते. त्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्जांसाठी १५ जूनची मुदत देण्यात आली. या परीक्षेसाठी ३३ हजार शिक्षकांनी नोंदणी केली.

हेही वाचा >>>पुणे: विदर्भात मोसमी पाऊस दाखल

जिल्हा परिषदांच्या तीन वर्षे अनुभव असलेल्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. त्यातही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे निश्‍चित करण्यात आली. या अटींमध्ये सवलत देण्यासाठी काही शिक्षक, संघटनांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार २५० जणांची अर्ज केले आहेत. आता अर्ज करण्यासाठीची सर्व प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन सूचना मागविल्या आहेत. मात्र शासनाकडून त्यावर काहीच ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.

हेही वाचा >>>धक्कादायक..! धावत्या रेल्वेतून उडी मारून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state examinations council has postponed the recruitment competitive examination for the post of center head pune print news ccp 14 amy
Show comments