पुणे : निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता गती मिळणार असून, निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
शिक्षक विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात ११ हजार ८५ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर लागू झाल्यामुळे निवड झालेल्या झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती. मात्र शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : ठिय्या आंदोलन रवींद्र धंगेकरांना भोवले, झाले काय ?
या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भातील सविस्तर आढावा शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.