उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट कायम असल्याने महाराष्ट्रातील थंडीही कायम आहे. मात्र, तापमानात किंचित वाढ होत आहे. १८ जानेवारीपासून उत्तरेकडील थंडीची लाट कमी होणार असल्याने महाराष्ट्रातही त्यानंतर तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. मुंबईत दिवसाच्या कमाल तापमानाचा पाराही घटला असल्याने उन्हाचा चटका घटला आहे.
हेही वाचा >>> राजस्थानी समाजाच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची मागणी
पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयीन विभागातील बर्फवृष्टी आणि त्यामुळे उत्तरेकडील राज्यांत गेल्या आठवड्यापासून थंडीची तीव्र लाट आहे. काही भागांत दाट धुक्यानेही कहर केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडील थंडीची लाट १७, १८ जानेवारीपासून कमी होणार आहे. त्यामुळे तीव्र थंडी आणि दाट धुके असलेल्या भागांना दिलासा मिळू शकेल. राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा आदी राज्यांमध्ये आणखी दोन दिवस थंडीच्या लाटेची स्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यातील गारवा दोन दिवस कायम राहील. १८ जानेवारीपासून उत्तरेकडील थंडी कमी होणार असल्याने गुजरात, मध्य प्रदेशचे तापमान वाढणार आहे. परिणामी राज्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी जळगाव येथे नीचांकी १०.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सध्या राज्यात कुठेही दहा अंशांखाली तापमान नाही. मात्र, सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली किंवा जवळपास आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी भागांत १० अंशांच्या आसपास तापमान आहे. विदर्भात काही प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. मुंबई आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे. रत्नागिरीत गारवा अधिक आहे. या विभागात दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी घट झाल्याने उन्हाचा चटका घटला आहे.