लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऊस उत्पादकता, गाळप आणि, उत्तम दर्जाच्या साखर अशा विविध मानकांवर आधारीत राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तेत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे, तर देशातील सर्वोत्तम सरकारी साखर कारखान्यांसाठी वंसंतदादा पाटील पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. आर्थिक वर्षातील (२०२३-२४) गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता.

देशातील एकूण २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. केंद्रीय सहकार सहसचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे उत्कृष्ट २५ सहकारी कारखान्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पारितोषिक समारंभ महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

या स्पर्धेत महाराष्ट्र (४१), उत्तर प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडू (प्रत्येकी १२), हरियाणा (१०), पंजाब (९), कर्नाटक (५) आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड येथील प्रत्येकी एक कारखान्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तमिळनाडू (५), उत्तर प्रदेश (४), गुजरात (३) तसेच पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

  • उत्कृष्ट ऊस उत्पादन
    प्रथम – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि, जुन्नर, जि. पुणे

द्वितीय – डॉ. जी. डी, बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना लि, कुंडल, जि. सांगली

  • तांत्रिक कार्यक्षमता
    प्रथम – यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि, कराड, जि. सातारा

द्वितीय – सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि, पो. श्रीपूर, जि. सोलापूर
तृतीय – डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि, पो. वांगी, जि. सांगली

  • उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
    प्रथम- अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि, जि. जालना</li>
  • विक्रमी ऊस गाळप
    प्रथम – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि, ता. माढा, जि. सोलापूर
  • विक्रमी साखर उतारा
    प्रथम – कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि, जि. कोल्हापूर</li>
  • उच्च साखर उतारा सर्वोत्कृष्ट कारखाना
    प्रथम – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि, ता. बारामती, जि. पुणे

देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्यासाठीचा प्रतिष्ठित वसंतदादा पाटील पुरस्कार
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे

Story img Loader