महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हे आणि स्वतंत्र प्रशासकीय गट म्हणून मानल्या गेलेल्या महानगर पालिका क्षेत्रातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट किंवा कठोर निर्बंध याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार, गुरुवारी १७ जून रोजी आलेल्या आकडेवारीनुसार तसेच, पुण्यातील सध्याच्या परिस्थितीनुसार पुणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये वीकएंडला कडक लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगर पालिकेकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलं आहे. तसेच, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. हे आदेश १८ जून म्हणजेच आजपासूनच लागू असणार आहेत.

शनिवार-रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानं!

नव्या निर्बंधांनुसार पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर दिली आहे. “पुणे मनपा हदद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा देता येईल”, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटमध्ये दिली आहे.

 

पालिकेने जाहीर केल्याप्रमाणे आजपासूनच नवे निर्बंध लागू होणार आहेत.

pune lockdown guidelines
पुणे महानगर पालिकेकडून नियमावली जाहीर

पालिकेची नवी नियमावली!

दरम्यान, पुण्यातील रुग्णसंख्येच्या अंदाजानुसार पुणे महानगर पालिकेने पुण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार…

> नव्या आदेशांनुसार अत्यावश्यक सेवा श्रेणीतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी.

> अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे शनिवार-रविवार बंद राहतील.

> रेस्टॉरंट, बर, फूड कोर्ट शनिवार-रविवार रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल किंवा घरपोच सेवा देतील.

> कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना – बी-बियाणे, खते, उपकरणे, देखभाल-दुरुस्ती याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची विक्री करणारी दुकाने किंवा गाळे आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहतील.

> पुणे कँटोन्मेंट बोर्ड आणि खडकी कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात देखील हे आदेश लागू असतील.

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध होणार शिथिल?

याव्यतिरिक्त इतर बाबींसाठी ११ जून रोजी जारी केलेली नियमावली कायम राहील.