पिंपरी :  मतांच्या लाचारीसाठी महाविकास आघाडीने २०१२ ते २०२४ या कालावधीत जेवढे दंगे झाले आहेत, त्या दंग्यांमधील मुस्लीम समाजातील आरोपींवरील गुन्हे माफ करण्याची मौलांनाची मागणी मान्य केली आहे. मतांच्या लांगुनचालनासाठी तळवे चाटत आहेत. ध्रुवीकरण केले जात आहे. त्यामुळे एक राहून मतांचे धर्मयुध्द करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. आमदार अमित गोरखे, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना (शिंदे) उपनेते इरफान सय्यद यावेळी उपस्थित होते.

सरकारने लाडकी बहिण योजनेचा मुस्लीम महिलांनाही लाभ दिला. सर्व योजनांमध्ये सर्व समाजाला सामावून घेतले. असे असताना महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद सुरू आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जागलो नाही तर पुन्हा झोपून रहावे लागेल. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन करून फडणवीस म्हणाले, लाडकी बहिण योजना यशस्वी होणार नाही, असे विरोधक म्हणत होते. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे टाकले. या योजनेविरोधात आघाडीचे लाेक न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना चपराक दिली. महायुतीचे पुन्हा सरकार आल्यास महिलांना दरमहा २१०० रूपये देण्यात येतील.

हेही वाचा >>> Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा २०१४ नंतर चेहरा-मोहरा बदलला. मेट्रो, उड्डाणपुल, पायाभूत सुविधा वेगाने तयार केल्या. त्यामुळे उद्योग पुण्यात येत आहेत. उद्योगांकडून वसुली करणारे नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. माक्रोसॉफ्टने इंडियाने हिंजवडीत मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, ५० हजारहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. कुत्तें भुकें हजार, हत्ती चले बाजार, असे म्हटले जाते. भोसरीत विकासकामे २०१४ नंतर झाली आहेत. शास्तीकर, उपयोगकर्ता शुल्क माफ केले. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणले.  त्यामुळे कोणी कितीही भुंकले तरीही आपली कामे झाकली जाणार नाही. कठीणातले कठीण प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे शहरातला रेडझोन प्रश्न तसेच ब्लू लाईन, रेड लाईनचाही प्रश्न सोडवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 devendra fadnavis campaign bjp candidate mahesh landge in chikhali bhosari assembly constituency pune print news ggy 03 zws