पुणे : जास्त मतदान झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची परंपरा कायम राहिली. मात्र, या निवडणुकीच्या निकालामध्ये मनसेची मते निर्णायक ठरली. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय मिळविणाऱ्या भाजपच्या भीमराव तापकीर यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मते घेऊन चौथ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला.
शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादीचे (शरद पवार) सचिन दोडके आणि मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांचे आव्हान होते. मात्र, या मतदारसंघात वांजळे यांच्या रूपाने धक्कादायक निकाल लागेल, अशी चर्चाही होती. मात्र तापकीर यांनी ५२ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला.
हेही वाचा : Pune Cantonement Vidhan sabha पुणे :’लाडक्या बहिणींमुळे…’ सुनील कांबळे काय म्हणाले ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे, भाजपचे मजबूत संघटन असतानाही गेल्या निवडणुकीत तापकीर निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्या निवडणुकीत तापकीर यांना दोडके यांनी आव्हान दिले होते. तापकीर यांना १ लाख ६३ हजार १३१ मते तर, पराभूत उमेदवार दोडके यांना १ लाख १० हजार ८०९ मते मिळाली. मनसेचे उमेदवार, या मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश यांनी ४२ हजार ८९७ मते घेऊन निर्णायक भूमिका बजावली.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत तापकीर यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ती कमी करण्यात दोडके यांना यश आले. त्यानंतर मात्र पुढील प्रत्येक फेरीत तापकीर आघाडीवर राहिले. मतदारसंघातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातूनही तापकीर यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा : शहरात जल्लोष; अनुचित घटना नाहीत- पोलिसांचा कडक बंदोबस्त
ठळक वैशिष्ट्ये
- भाजपचे संघटन, आणि संघशक्तीचा तापकीर यांना लाभ
- मनसेची मते निर्णायक
- महायुतीमधील राष्ट्रवादीच्या ताकदीचा फायदा
- राष्ट्रवादीतील फुटीचा दोडके यांना तोटा
हा विजय विकासाच्या स्वप्नांचा, समस्यांच्या समाधानाचा आणि एकत्रित काम करण्याच्या निर्धाराचा आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले जाईल.
भीमराव तापकीर, विजयी उमेदवार