पुणे : महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइं (आठवले) पक्षाला दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रिपाइं महायुतीच्या उमेदवारांच्या मागे सक्षमपणे उभे राहत प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. रिपाइं (आठवले) महायुतीचा मित्रपक्ष असल्याने विधानसभेच्या जागावाटपामध्ये पक्षाला १० ते १२ जागा मिळव्यात अशी मागणी ‘रिपाइं’कडून केली जात होती. महायुतीच्या जागावाटपामध्ये जागा निश्चित होत नसल्याने ‘रिपाइं’चे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पक्षाचा कोणताही पदाधिकारी महायुतीच्या व्यासपीठावर जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. अखेर महायुतीच्या जागा वाटपामध्ये मुंबईतील धारावी आणि कलिना हे दोन मतदारसंघ ‘रिपाइं’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> कंत्राटी कामगारांचा विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय ! मतदानावर बहिष्कार टाकण्याचा राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

महायुतीने घेतलेल्या निर्णयामुळे ‘रिपाइं’ची नाराजी दूर झाली असून, निवडणुकीत महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास एक विधान परिषद, एक कॅबिनेट मंत्रिपद, तसेच चार महामंडळांची अध्यक्षपदे, जिल्हा तालुका शासकीय समिती सदस्यपदे यांसह महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांना दिले आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करत महायुतीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, महासचिव बाळासाहेब जानराव, राज्य सदस्य अशोक कांबळे, पुणे शहर सरचिटणीस श्याम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, महेंद्र कांबळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 mahayuti ally rpi a get 2 seats for assembly election pune print news ccm 82 zws