पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (२३ नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी शहर, उपनगर परिसरात अडीच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. बंदोबस्तासाठी निमलष्करी दल, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. कोरेगाव पार्क भागातील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात मतमोजणी होणार आहे. कोरेगाव पार्क भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात येेणार आहे.

उमेदवारांचे निवासस्थान, पक्ष कार्यालय, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये होणारा वाद, घोषणाबाजीमुळे तणाव, तसेच वादावादीच्या घटना होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. संवेदनशील भाग, शहरातील महत्त्वाच्या चौकांत बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा : एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक… काय आहेत मार्गदर्शक सूचना?

मतमोजणी केंद्राच्या परिसरात निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, साध्या वेशातील पोलीसही तैनात असतील. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष शाखेच्या पथकांकडून संवेदनशील भागावर नजर ठेवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांना शहराच्या वेगवेगळ्या भागांत गस्त घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पाेलीस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, १९ सहायक पोलीस आयुक्त, ३५० पोलीस अधिकारी, २५०० पोलीस कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२ तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील मतमोजणी कधी पूर्ण होणार ? प्रशासनाची तयारी काय ?

पक्ष कार्यालय, उमेदवारांच्या निवासस्थान परिसरात बंदोबस्त

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून शहरातील विविध पक्ष कार्यालये, उमेदवारांचे निवासस्थान, तसेच संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार घडल्यास पाच ते दहा मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शीघ्र कृती दलाच्या तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत.

हेही वाचा : ‘पर्वती’त कौल कुणाला? मिसाळ यांची विजयाची मालिका सुरु राहणार की…

समाजमाध्यमातील संदेशांवर नजर

निकालानंतर समाजमाध्यमात प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. सायबर पोलिसांच्या पथकांकडून समाजमाध्यमातील घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाद निर्माण करणारे, तसेच अफवा पसरविणारे संदेश प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.