पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या ‘मावळ पॅटर्न’मुळे हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीनेही भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळातील लढत चुरशीची होणार असून ‘मावळ पॅटर्न’ यशस्वी करण्याचे सर्वपक्षीयांपुढे आव्हान आहे.

मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. १९९० पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. या वर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रूपलेखा ढोरे यांना भाजपने ऐन वेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षे भाजपचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे मावळ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. बालेकिल्ला ताब्यातून गेल्याने भाजपचे प्रदेश नेतेही नाराज होते. शेळके महायुतीत आले, तरी मावळ भाजपचा त्यांना विरोध राहिला.

हेही वाचा – १६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे नव्हे, तर पदाचे राजीनामे देऊन राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असलेल्या बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने असा ‘मावळ पॅटर्न’ निर्माण झाला. महाविकास आघाडी, मनसेने बापू यांना पाठिंबा देऊन या पॅटर्नला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे संपूर्ण पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे काही पदाधिकारी बापू यांचा प्रचार करत आहेत.

‘आम्ही सर्व जण एकत्र का आलाे, हे राज्याने जाणून घ्यावे. आमदारांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहे. तसेच, पाच वर्षांत त्रास दिल्याचा मुद्दा आहे,’ असे मावळ पॅटर्नकडून प्रचारात सांगितले जाते. ‘आमदार शेळके यांनी एकदाच संधी मागितली होती, आता शब्द पाळला नाही. उद्योग बाहेर गेल्याने अनेकांचा रोजगार गेला, विकास झाला नाही,’ असा बापू भेगडे यांचा दावा आहे.

हेही वाचा – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

‘मी कोणाला शब्द दिला नव्हता. नेते विरोधात असून जनता माझ्यासोबत आहे. मावळसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास केला,’ असे शेळके यांच्याकडून प्रचारात सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शेळके आणि भेगडे यांच्यात लढत होत असली तरी मावळ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेळके यांच्या पराभवासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मावळमध्ये चुरस वाढली असून, या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव या भागांतील शहरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, यावर विजयाची समीकरणे अवलंबून असतील. लोकसभेला शहरी भागातून शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे यांना मताधिक्य होते, तर ग्रामीण भागातून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे पुढे होते. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) सर्वजण एकत्र असतानाही बारणे यांना या मतदारसंघात केवळ चार हजारांचे मताधिक्य होते.

असा आहे मतदारसंघ

एकूण मतदार : ३,८६,१७२

पुरुष मतदार : १,९७,४३६

महिला मतदार : १,८८,७२३

तृतीयपंथी : १३