पुणे : राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. तुरळक ठिकाणी होणारा हलका पाऊसवगळता राज्याच्या बहुतेक भागात पावसाची काहीशी उघडीप राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात चंद्रपूरजवळ सोमवारी केंद्रित झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कमी राहील. मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच हलका पावसाचा अंदाज आहे. हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मोसमी पावसाचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे कलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत ताशी ४८ किमी वेगाने येणाऱ्या आर्द्रतायुक्त पश्चिमी वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. हे वारे ताशी २० ते २५ किमी वेगाने मुंबईसह किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर हलक्या सरींची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. पण, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

हेही वाचा : पुण्यात आधीच डेंग्यूचा धोका अन् त्यातच आता रक्तासह प्लेटलेटचा तुटवडा

दरम्यान, विदर्भवगळता महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी होऊन २८ अंशांच्या आसपास आहे. तर पहाटेचे किमान तापमानही सध्या सरासरीइतके म्हणजे २२ अंशांच्या आसपास आहे. कमाल व किमान तापमानातील फरक कमी कमी होत आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. आर्द्रता वाढल्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. गुरुवारी (५ सप्टेबर) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास सप्टेंबरमधील पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. राज्यभरात पुढील चार दिवस किरकोळ प्रमाणात हलक्या सरी पडतील. राज्यात कोठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. चार-पाच दिवस काहीशी उघडीप मिळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.