पुणे : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा आणि दाट धुक्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागांत पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे.
हेही वाचा : सदाभाऊ खोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक
मंगळवारी औरंगाबादमध्ये ९.२, जळगावात ९.४, नगरमध्ये ९.६, नाशिकमध्ये ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातही किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. पुढील चार दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा आठ ते नऊ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर राज्याच्या अन्य भागात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस थंडीत वाढ होण्यासह पहाटे धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.