पुणे : थंडीचा जोर वाढत असल्याने शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रात्री आणि दिवसाही वातावरण थंड असून, यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी १०.५ अंश सेल्सियस तापमान एनडीए येथे नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज आहे.
हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने घट होत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्र आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळून उत्तरेकडे वाटचाल करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात आर्द्रता वाढू शकते. तसेच नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमध्ये वाढ होऊन रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत हंगामातील एक आकडी किमान तापमान नोंदवले जाऊ शकते, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.
हेही वाचा : अलंकापुरीत वैष्णवांची मांदियाळी; इंद्रायणी काठ फुलला
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सोमवारी एनडीए येथे सर्वांत कमी १०.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर तळेगाव येथे १९.०, हवेली आणि शिरूर येथे ११, आंबेगाव येथे ११.५, शिवाजीनगर येथे १२.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी हवेली येथे ११.५ अंश सेल्सियस, तळेगाव येथे १२.२, एनडीए येथे १२.३, शिवाजीनगर येथे १३.४ तापमान होते.
हेही वाचा : हवाई प्रवाशांना खूषखबर! पुणे विमानतळावरून आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे
शहरातील गारवा वाढत असल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे आहेत. तसेच दिवसाही थंड वारे, गारव्यामुळे स्वेटर घातले जाऊ लागले आहेत.