पुणे : वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांवर तसेच पदपथांवर झालेली अतिक्रमणे, अशा प्रश्नांना सामोरा जाणारा वडगाव शेरी मतदारसंघ यातून सुटकेची वाट पाहतो आहे. हे प्रश्न वर्षानुवर्षे कायम असल्याने याचा त्रास येथील स्थानिक नागरिकांसह बाहेरगावहून कामानिमित्त या भागात येणाऱ्या नोकरदारांना होतो.

साधारण १५ वर्षांपूर्वी लोहगाव, धानोरी, चंदननगर, कळस आणि आजूबाजूच्या गावांचा समावेश महापालिका हद्दीत झाल्यानंतर या भागाचे शहरीकरण होण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघातच अनेक नामांकित पब्ज, हॉटेल्स, मॉल्स, बार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत हा भाग गजबजलेला असतो. आठवड्याच्या अखेरीस तरुणाई मोठ्या संख्येने या भागातील बार आणि पब्जमध्ये हजेरी लावते. काही महिन्यांपूर्वी झालेला पोर्श कार अपघातदेखील या मतदारसंघातील कल्याणीनगर भागात झाला होता.

या मतदारसंघातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या भागासाठी राज्य शासनाने भामा-आसखेड धरणातून २.६ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. हे पाणी पूर्व भागामध्ये आले, तरी लोहगाव, विमाननगर येथे पाणीपुरवठा नियमित नाही. अनेक उच्चभ्रू सोसायट्यांना टँकरने पाणी घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला लाखो रुपये खर्च करावा लागतो. यामुळे या भागातील टँकर लॉबी चा मनमानी कारभार सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू असलेला टँकरने पाणी देण्याचा प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिकेला यश आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यामध्ये बहुतांश टँकर हे राजकीय मंडळींचे असून या परिसरात बाहेरून कोणाचाही टँकर येथे येऊ दिला जात नाही.

हेही वाचा >>> पूर्वसुरींच्या नैतिक राजकारणाचा वस्तुपाठ

येरवडा ते अहिल्यानगर हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग या भागात आहे. या रस्त्याला दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. शहरीकरणामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. खराडी आयटी पार्कमुळे दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी असल्याने सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. पदपथ तसेच रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढून टाकल्याने वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

हेही वाचा >>> ‘मावळ पॅटर्न’वरून अजितदादांच्या आमदाराचा भाजपला इशारा; म्हणाले, राज्यभरात…

शहराचा पूर्वेकडील भाग अशी ओळख असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात नामांकित आयटी कंपन्या, त्यांची कार्यालये, मोठ्या सोसायट्या तसेच काही भागांत झोपडपट्टी असे चित्र आहे. धानोरी, कळस, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, मांजरी खुर्द, येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी, शांतीनगर, सिद्धार्थनगर असा भाग या मतदारसंघात येतो. काही ठिकाणी उच्च सोसायट्या, तर काही भागांत ग्रामीण संस्कृतीचा ठसा, असे चित्र येथे आहे.

प्रमुख समस्या

– अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टँकरवर लाखोंचा खर्च

– प्रशस्त रस्ते असूनही प्रचंड वाहतूक कोंडी

– पदपथांवर अतिक्रमणे – रात्रजीवन आणि अपघात