पुणे : महारेराने नोटीस व्यापगत म्हणजेच मुदतीत पूर्ण न झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस बजावली होती. त्यानंतर ३ हजार ६९९ व्यापगत प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र महारेराच्या संकेतस्थळावर अपलोड केले आहे. या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करण्याची सूचना महारेराने स्थानिक प्राधिकरणांना केली आहे. यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली असून, यात पुण्यातील १ हजार २१३ प्रकल्पांचा समावेश आहे.
कल्याण – डोंबिवली भागातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या भोगवटा प्रमाणपत्राबाबत फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविले आहे. महारेराने व्यापगत प्रकल्पांना नोटीस पाठविल्या होत्या. त्यानंतर ३ हजार ६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यांना संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केले आहे. याचाच भाग म्हणून सर्व संबंधित प्राधिकरणांना या प्रकल्पांचा तपशील पाठवून या प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र जारी केले का, याची खात्री करण्याची सूचना महारेराने केली आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती महारेराला १० दिवसांत कळविण्यास सांगण्यात आले आहे.
भोगवटा प्रमाणपत्राची पडताळणी होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पुणे परिसरातील १ हजार २२३, मुंबई महाप्रदेशातील १ हजार ८१९, नाशिक परिसरातील २७३, छत्रपती संभाजीनगर परिसरातील १३२, अमरावती परिसरातील ८४ आणि नागपूर परिसरातील १६८ अशा एकूण ३ हजार ६९९ प्रकल्पांचा समावेश आहे. नियोजन प्राधिकरणांकडून १० दिवसांत प्रकल्पांबाबत प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रातील भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे, असे गृहीत धरून या अनुषंगाने प्रकल्प पूर्ण झाल्याची प्रक्रिया महारेरा सुरू करेल. यात काही चुकीचे झाल्यास त्याची जोखीम आणि खर्चासह संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील, असे महारेराने पत्रात म्हटले आहे.
प्रकल्पांसाठी भोगवटा प्रमाणपत्र बंधनकारक
प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला काही अटींसापेक्ष सदनिका विक्रीसाठी महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्प उभारणीच्या काळात त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक अंकेक्षण अहवाल सादर करावे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. हे भोगवटा प्रमाणपत्र महारेराने स्वीकारले, की संबंधित प्रवर्तकाला त्या प्रवर्तकाच्या खात्यातील सर्व पैसे काढण्याचे स्वातंत्र्य असते. शिवाय त्यांना त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुठलीही विवरणपत्रे भरावी लागत नाहीत.
पुणे विभागातील भोगवटा प्रमाणपत्र पडताळणी
पुणे – १ हजार १५
कोल्हापूर- ४९
सांगली – ५५
सातारा- ६९
सोलापूर- ३५
एकूण – १ हजार २२३