देशाला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण, सामाजिक स्वातंत्र्य आहे कुठे, असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी दलितांवरील अत्याचाराच्या कहाण्या ऐकून मन विदीर्ण होते, अशी भावना रविवारी व्यक्त केली. सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारांची कास धरावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले स्मारक ट्रस्टतर्फे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते भाई वैद्य यांना ‘महात्मा फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, माजी महापौर दत्ता एकबोटे, रवींद्र माळवदकर, भीमराव पाटोळे, ट्रस्टचे अध्यक्ष विश्वनाथ परदेशी आणि सचिव डॉ. गणेश परदेशी या वेळी उपस्थित होते.
भाई वैद्य म्हणाले, लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार नाही. तर, सर्व माणसे समान आहेत ही संविधानाची भूमिका आहे ती फुले यांनी पूर्वीच मांडली होती. महात्मा फुले यांना त्या काळी समाजाने पुरेशी साथ दिली नाही. किंबहुना सनातन्यांनी त्यांच्या कार्याची निर्भर्त्सनाच केली. मात्र, आता फुले यांच्या विचारांसंदर्भात देशभरामध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. गुणवत्तेमध्ये मुली अग्रेसर आहेत याचे श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आहे.
श्रीनवास पाटील म्हणाले, एकीचे बळ ज्ञानाच्या अमृतातून येईल ही धारणा असलेल्या महात्मा फुले यांनी विद्येची कास धरली. सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सामाजिक समतेसाठी काम करणारे महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा असलेले भाई वैद्य विषमता दूर करण्यासाठी या वयातही त्याच तडफेने कार्यरत आहेत. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा