फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना पडता काळ आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राजकारणात असे होऊ शकते. पण, खरे विचारवंत हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पायाशी असतात. त्यामुळे महात्मा फुले यांच्या कार्याचा राजकारणविरहित विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. महात्मा फुले यांना केवळ ग्रंथात, तसबिरीत आणि पुतळ्यात गुंतवू नका. फुले सर्वाचेच आहेत, असेही नेमाडे म्हणाले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मनुष्यबळ विकासराज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते भालचंद्र नेमाडे यांनी महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर दत्ता धनकवडे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, प्रतिमा नेमाडे, प्रा. हरी नरके, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कृष्णकांत कुदळे, कमल ढोले-पाटील, समीर भुजबळ, पंकज भुजबळ या वेळी उपस्थित होते.
फुले वाडा हा जगातील दीनदलितांचा केंद्रबिंदू व्हावा, असे सांगून नेमाडे म्हणाले, ज्या लघुपत्रिका (लिटिल मॅगझिन) चळवळीतून मी लिहिता झालो, तिचा जन्म फुले यांच्या पत्रिकेतूनच झाला आहे. सामाजिक जाणिवा पुढे नेण्याचे काम करीत असल्याने लेखकाचे विचारधन कायमस्वरूपी टिकते. समग्र साहित्याची संकल्पना आली आहे. पण, समग्र साहित्य कोणी घेत नाहीत आणि जे घेतात त्यांना काय वाचायचे हे कळत नाही. त्यामुळे सुटे-सुटे ग्रंथ आले पाहिजेत. शूद्र आणि महिला यांच्यासाठी काम करीत महात्मा फुले यांनी भारतीयत्वाची कल्पना दिली. त्यांच्या कार्याचे स्मरण करीत पुन्हा पुन्हा इतिहास लिहिला पाहिजे. आपले आदर्श तपासून घेतले पाहिजेत आणि आवश्यकता असेल तर आदर्श बदलले पाहिजेत.
फुलेंना जातीच्या बंधनात अडकवू नका असे शिकविणारे आज फुले यांना वंदन करायला का आले नाहीत, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. समता भूमी आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांना जोडणाऱ्या २५० मीटर रस्त्याचे काम तीन वर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण, फुलेंचे अनुयायी रस्त्यावर येत नसल्याने सरकापर्यंत आवाज जात नाही, असे सांगून भुजबळ यांनी रामपालसारख्या महाराजापासून दूर राहण्यासाठी समाजाला फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे औषध दिले पाहिजे, असे स्पष्ट केले.
स्त्री भ्रूणहत्या ही गंभीर समस्या असून मुलींच्या अस्तित्वावर संकट आले आहे. महिला साक्षरतेमध्ये मागे असलेली राज्ये प्रगतीमध्ये पिछाडीवर आहेत. मुलींना जगविणे आणि शिक्षण देणे आवश्यक असल्याचे उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.
हरी नरके यांनी नेमाडे यांच्या मानपत्राचे वाचन केले. कृष्णकांत कुदळे यांनी प्रास्ताविक केले.
नेमाडे उवाच…
– पुरोगामी असण्यासाठी जात चोरण्याची पद्धत आली आहे. जात चोरण्यापेक्षा सांगणे महत्त्वाचे आहे. जात लपविण्याच्या अशा वृत्तीमुळे माणसाला दोन ‘स्पेस’ मिळतात. एक स्वत:चा अवकाश आणि दुसरा नावामुळे मिळणारा अवकाश.
– महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा आसामी अनुवाद होत असून त्याचे टिपण मी पाहिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पुस्तकामध्ये सावित्रीबाईंचा धडा समाविष्ट करण्यात येत असून त्याचे वाचन मीच करून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा