उत्तम वास्तुस्थापत्याचा नमुना असलेली इमारत आणि जागोजागी शहराच्या अनेक वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पाऊलखुणा ल्यालेली महात्मा फुले मंडई अगदी कमी वेळातही नवख्या माणसासमोर शहराचे साधे आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व उलगडते. ठिकठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मंडई पुण्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरली नाही तरच नवल.
कोणत्याही नव्या शहरात गेल्यावर तिथल्या खऱ्या जनजीवनाचा ‘फील’ घ्यायचा असेल तर स्थानिक बाजारपेठेस भेट द्यावी असे म्हणतात. वेगवेगळ्या वस्तूंच्या बाजारपेठा वेगळ्या असल्या तरी भाजी मंडई मात्र सर्व बाजारपेठांच्या केंद्रस्थानी असते. पण पुण्यातील महात्मा फुले मंडईचे ‘खास’पण ताज्या भाजी-फळांवरच संपत नाही.
पुण्याची मंडई म्हटल्यावर मंडईची आठ पाकळ्यांची देखणी इमारत डोळ्यांसमोर उभी राहते. या जुन्या मंडईचे पूर्वीचे नाव ‘रे मार्केट’. पूर्वी मंडई गावकोस मारुतीजवळ आणि नंतर शनिवारवाडय़ाच्या पटांगणात भरत असे. त्यानंतर बांधल्या गेलेल्या ‘रे मार्केट’चे ५ ऑक्टोबर १८८६ ला उद्घाटन करण्यात आले. मंडईची ही जागा सरदार खासगीवाले यांची होती. पालिकेने त्यातील चार एकर जागा खरेदी करून त्यावर जुनी मंडई बांधली. पण ही जुनी मंडई महात्मा फुले मंडई याच नावाने प्रसिद्ध आहे. भाजीविक्रेत्यांसाठी ही मंडई अपुरी पडत असल्याने साठच्या दशकात त्यालाच लागून नवी मंडई उभी राहिली. तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. यातील जुन्या मंडईच्या इमारतीत नाशवंत भाजीपाला हवेशीर वातावरणात राहावा या दूरदृष्टीने केलेली गाळ्यांची रचना, इमारतीच्या प्रत्येक पाकळीच्या बांधणीतील सौंदर्यदृष्टी अगदी आवर्जून पाहण्यासारखी आहे. त्यामुळेच ठिकठिकाणाहून पुण्यात येणाऱ्या चोखंदळ पर्यटकांची पावले मंडईकडे आपसूक वळतात. परंतु केवळ इमारतीसाठीच मंडई पाहण्याजोगी आहे असे मुळीच नाही. मंडईच्या संपूर्ण परिसरात पावला-पावलावर जुन्या पुण्याचे दर्शन घडते. भाजी-फळांच्या मंडईबरोबरच या परिसरात वसलेल्या इतर वस्तूंच्या लहान बाजारपेठाही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात.
मंडईच्या जुन्या इमारतीसमोर असलेल्या लोकमान्य टिळकांच्या संगमरवरी पुतळ्यापासूनच या जुन्या पुण्याच्या दर्शनास सुरूवात होते. या पुतळ्याचे अनावरण १९२४ मध्ये मोतीलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. हा भाग म्हणजे मोठमोठय़ा नेत्यांच्या सभा, सामाजिक आंदोलने, मोर्चे अशा अनेक घडामोडींचे केंद्रस्थान. या पुतळ्याकडे तोंड करून उभे राहिले तर उजव्या हातास आत्तार गल्ली (म्हणजे आप्पासाहेब थोरात मिनी मार्केट). प्रामुख्याने पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या या दुकानांमध्ये प्रत्येक सणाला लागणाऱ्या सजावटीच्या लहानमोठय़ा वस्तू मिळतात. टिळक पुतळ्याच्या डाव्या हाताला फळविक्रेते बागवान आणि विडय़ाची पाने विकणाऱ्या तांबोळी समाजाची दुकाने आहेत. या दोन्हीच्या मध्ये असलेल्या भागात पूर्वी टांगातळ होता. मिनव्र्हा आणि आर्यन चित्रपटगृहे हीदेखील एकेकाळी या ठिकाणाची ओळख होती. गावातून आलेली कष्टकरी मंडळी सहकुटुंब आर्यन चित्रपटगृहात मराठी चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून जात.
जुन्या मंडईत फेरफटका मारून नव्या मंडईकडे गेल्यावर कष्टकरी समाजासाठीचे झुणका-भाकर विक्री केंद्र नजरेत भरते. ‘कष्टकरी १९७२ च्या दुष्काळात मोठय़ा प्रमाणावर पुण्यात पोटापाण्याच्या शोधात येत असे. आप्पा थोरात यांनी त्या वेळी प्रथम येथे ५० पैशांमध्ये झुणका- भाकर उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. काही कामगारांचे विवाह देखील या केंद्रातच झाले. मंडईतील श्रमसंस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडते. झुणका-भाकर केंद्राच्या समोरच्या अंगणात पूर्वीपासून गारूडी, मदारी, डोंबारी, दरवेशी अशा खेळियांचे खेळही होत असत,’ असे सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ सांगतात. नवीन मंडईच्या आसपास देखील मंडईशी निगडित असलेले इतर व्यवसाय वसले. अनेकांचे चहाबरोबर गप्पांचा अड्डा जमवण्याचे आवडते ‘कांबळे टी हाऊस’ असो किंवा धान्य, शेंगदाणे भाजून देणाऱ्या भट्टय़ा असोत. नव्या मंडईसमोर आताच्या गणपती मंडळाच्या मांडवाच्या जागी पूर्वी गाडीतळ होता. शेतकरी आपल्या बैलगाडय़ा या ठिकाणी लावत. याच्याच शेजारी आहे बांबूकामाच्या वस्तू आणि टोपल्या विकणारी बुरूड आळी. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंडईच्या गणपतीची मूर्तीही इतर कुठे सहसा पाहायला मिळणार नाही अशी वैशिष्टय़पूर्ण आणि राजेशाही बैठकीची आहे. मंडईतील व्यावसायिकांमध्ये असलेली एकात्मता या मंडळाच्या गणेशोत्सवात बघायला मिळते.
शहराच्या मध्यभागात असलेली गजबजलेली, पण तितकीच आनंद देणारी ही मंडई जुन्या पुण्याची सफर नक्की घडवेल.
sampada.sovani@expressindia.com