‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ अशा वास्तववादी कवितेने वाङ्मय जगताचे लक्ष वेधून घेणारे ज्येष्ठ कवी डाॅ. यशवंत मनोहर यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, महात्मा फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे: परराज्यातून येऊन शहरात दुचाकी चोरी; चोरट्याकडून चार दुचाकी जप्त

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथील महात्मा फुले वाडा परिसरात सोमवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते मनोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे आणि पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. यशवंत मनोहर यांचे नाव मराठी साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक चळवळीत अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी एक गाव एक पाणवठा, सामाजिक समता समिती, संविधान बचाव समिती अशा अनेक संघटनांद्वारे प्रत्यक्ष सामाजिक कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्याविषयी  वैचारिक साहित्य निर्माण करणारे मनोहर यांनी दलित कवितेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma phule samata award announced to dr yashwant manohar pune print news amy