अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, एक लाख रुपये, मानचिन्ह आणि फुले पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी या पुरस्काराने प्रा. हरि नरके, उत्तम कांबळे, डॉ. बाबा आढाव, वीरप्पा मोईली, डॉ.भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर,डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुंधती रॉय, खासदार शरद यादव आणि डॉ. मा.गो. माळी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा फुले यांच्या १२८ व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी ‘समता दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शरद पवार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समता भूमी, महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, महात्मा फुले पेठ, पुणे येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत.