कसबा विधासभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपा जोरात तयारीला लागली आहे. तर भाजपाचा मतदारसंघ मिळवण्यासाठी महाविकासआघाडीकडून विषेश तयारी करण्यात येत आहे. भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळत आहे. नुकतेच नवी पेठमधील मनसे कार्यालयास महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भेट दिली. धंगेकर यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आम्ही अगोदरच भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून या भेटीवरुन कोणीही संभ्रम करू नये, असे स्पष्टल भूमिका मनसेचे प्रवक्ते योगेश खैर यांनी व्यक्त केली आहे.
त्यावेळी कार्यालयात मनसेचे नेते अनिल शिदोरे,बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच अन्य नेते मंडळी उपस्थित होते. त्यावेळी रवींद्र धंगेकर यांचे मनसे कार्यालयात स्वागत करित संवाद देखील साधण्यात आला. तर मनसेकडून रविंद्र धंगेकर हे दोन वेळेस नगरसेवक राहिले असून आमदारकीची निवडणुक देखील लढवली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खूप मोठ्या कालखंडानंतर रवींद्र धंगेकर यांनी जुन्या सहकार्याची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चाना उधाण आले. तर यापूर्वीच मनसेने भाजप उमेदवार हेमंत रासने पाठिंबा दिला आहे.या भेटीनंतर सोशल मीडिया आणि शहराच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली.
हेही वाचा- “गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली”; भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांचे विधान
मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे म्हणाले की, आमची नेहमी प्रमाणे पदाधिकाऱ्यांची बैठक काल होती.तशीच बैठक काल देखील होती.त्याच दरम्यान रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा आमच्या कार्यालया समोरून जात होती.त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमची सर्वांची त्यांनी भेट घेतली.आपल्या घरात कोणीही आल्यावर स्वागत करतो.ही आपली संस्कृती असून त्यांच स्वागत केले.आम्ही यापूर्वीच भाजपच्या दोन्ही उमेदवाराना पाठिंबा दिला आहे.त्यामुळे यावरून कोणताही संभ्रम निर्माण करू नये अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.