पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. पण, आमच्या मागणीकडे लक्ष न देताच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. हा प्रकार महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी घातक आहे, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) दिला आहे.

पक्षाची भूमिका मांडताना डॉ. अजित नवले म्हणाले, माकप व जनसंघटनांचे चांगले काम असलेल्या, प्रदीर्घ आणि यशस्वी लढे दिलेल्या ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. आमची मागणी मर्यादित जागांची असून, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या बाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती. पक्षाच्या वतीने लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना त्यावेळीच लिखित स्वरुपात सादर केली होती. महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात, अशी मागणी केली होती. पण, महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागा वाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे.

हेही वाचा : अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण…शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय?

लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा तीन मुख्य पक्षांमध्ये वाटून घेतल्या व त्यानंतर इतर पक्षांच्या बरोबर त्यांचा केवळ पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली. माकपने तेव्हाही महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचे हे असे करणे चुकीचे असल्याबद्दल आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. किमान विधानसभेच्या जागा वाटपात तरी अशा प्रकारे आपसांत तीन पक्षांनी जागा वाटून घेऊन नंतर डावे पुरोगामी पक्ष व संघटनांबरोबर चर्चा सुरू करण्याची चूक होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल विनंती केली होती. मात्र, लोकसभेच्या वेळेस जे झाले तेच विधानसभेच्या वेळेस घडताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला हे प्रमुख तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून माकपने व इतर डाव्या पक्षांनी लढवण्यासाठी सादर केलेल्या जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी आणत आहेत. महाविकास आघाडीतील या तीन पक्षांची ही कृती समन्वयाच्या व एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा आणणारी आहे, असेही नवले म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra Rain News: पावसाची उघडीप पाच ऑक्टोंबरपर्यंत? जाणून घ्या मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची स्थिती

….तर महाविकास आघाडी असेल जबाबदार

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांच्या मागण्यांचा महाविकास आघाडीने तातडीने विचार करावा. महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. जागा वाटपाच्या चर्चेत आम्हाला सहभागी करून न घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस आघाडी जबाबदार असेल, अशा इशारा माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिला आहे.

Story img Loader